रेक्टर बर्वे सर

‘चार शब्द’ या मासिकाच्या २०१३ दिवाळी अंकाचा मुख्य विषय ‘आठवणीतले अवलिया’ हा होता. त्यासंदर्भात वालचंद कॉलेजचे माजी विद्यार्थी श्रीकांत महाजन यांचा रेक्टर बर्वेसरांच्याविषयी एक उत्कृष्ट लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या अनुमतीने हा लेख आपल्या माहितीसाठी देत आहोत. सौजन्य - ‘चार शब्द’ मासिक.

सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे साधारण ६०-८०च्या जवळजवळ दोन दशकातील माजी विद्यार्थी जर पुढे काही कारणाने भेटले वा व्यवसायानिमित्त त्यांची ओळख झाली तर तेथील हॉस्टेलच्या बर्वेसरांची आठवण वा चौकशी करणारच. कारण ते व्यक्तिमत्त्वच मुळी असामान्य अवलिया होते. या आठवणींमध्ये स्वत:ला सरांकडून झालेल्या शिक्षेबद्दलचा उल्लेखही टाळला जात नाही. कारण सरांनी केलेली शिक्षा कधीच चुकीची नसायची. त्यामुळे गुन्हेगारास (!) त्यांच्याविषयी कधीही राग येत नसे. या हॉस्टेलसंबंधीच्या वेगवेगळया लोकांनी- ज्यामध्ये मेसमधील आचारी/वाढपी, राहणारे विद्यार्थी, विविध सेवा देणारे कर्मचारी/व्यावसायिक यांचा समावेश होतो- अशा शिक्षांची चुणूक अनुभवली होती. सरांच्या निवृत्तीनंतर असे समजले की, चार रेक्टर्स तेथे नेमावे लागले, जे काम ते एकट्याने करत.

तेथील हॉस्टेलमध्ये निवासाच्या ८ तीन मजली इमारती, २ बैठ्या इमारती, २ मेस व १ दळणाच्या गिरणीसह धान्य, गॅस सिलिंडर्सचे गोडाऊन असा आटोपशीर कारभार होता. निवासाच्या प्रत्येक बिल्डिंगसाठी असणारा सरांचा सेवेकरी वर्ग ऑल राऊंडर असायचा. बागेतील गवत कापणे, रूम-व्हरांडे इ. परिसर झाडण्यापासून विद्यार्थ्यांच्या रूममध्ये सरांकडून रोज प्राप्त झालेली आपल्या पालकांची/मित्रांची पत्रे रोजच्या रोज वाटपापर्यंत सर्व काही कामांसाठी तो सज्ज असायचा. तर, मेसमध्ये साधारण दर ५० विद्यार्थ्यांमागे १ आचारी, २ वाढपी असलेले एकूण १० तरी क्लब होते व रोटेशन पद्धतीने ५० विद्यार्थ्यांचा प्रत्येक गट आपल्या चार वर्षांच्या शिक्षण कालावधीत सर्व क्लबची चव घ्यायचा. म्हणजे एखाद्याच आचाऱ्याच्या चवीशी शेवटपर्यंत गाठ पडलीय असा प्रकार नव्हता, तर सर्व आचाऱ्यांच्या कमीजास्त कुशलतेचा लाभ सर्वांना होई, अशीच योजना होती. अशा अनेक गोष्टींमध्ये सरांचे विशिष्ट उद्देश असत व या सर्वांमागे नैसर्गिक न्याय हे तत्त्व होते, असे आता जाणवते. अगदी भाजी व दूध पुरवठादार दोन-दोन असल्याने त्यांच्यात स्पर्धात्मक गुणवत्ता राखली जाण्याची शक्यता ठेवलेली आहे. हे मुद्दाम सांगितले पाहिजे की, स्वत:च्या घरची आठवड्याची भाजी ते स्वत: ३ मैलावरील सांगलीच्या मंडईत सायकलवर जाऊन दर शनिवारी आणायचे.

असंख्य कामे केवळ एकट्याने वेळच्या वेळी पार पाडण्यासाठी सर्व कामांचे दिवसवार व वर्षभराचे वेळापत्रक `आजीच्या घड्याळा'प्रमाणे अलिखित असे व त्यांचा दिवस सकाळी ६ ला सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चाले. साधारण सकाळी ११च्या सुमारास पोस्टमनने आणलेली पत्रे त्या त्या बिल्डिंगच्या सेवेकऱ्यास वितरित करताना त्या प्रत्येक पत्रावर सेवेकऱ्यांना समजण्यासाठी मराठीत रूम नंबर ते स्वत: लिहीत. तो काळ रेशनिंगचा असल्याने आमची रेशनकार्डे हॉस्टेलवर जमा केलेली असल्याने विद्यार्थ्यांना रूमवर चहा करण्यासाठी ५०० विद्यार्थ्यांना रेशनच्या ६५० ग्रॅम साखरेचे वाटप टर्ममधून दोनदा केवळ तास-दोन तासाच्या अवधीत ते करीत. त्यासाठी आधी सूचना दिल्याप्रमाणे मापाने ही साखर दिली जाई. आमच्यासारख्या कोणी सरांना विचारले, की सर ही साखर ६५० ग्रॅम कशावरून (आणि असा चावटपणा सरांना जोखण्यासाठी मी अनेकदा केलेला होता), तर त्यावर सर वाटप करणाऱ्या विठ्ठल या सर्वकाळ त्यांच्याबरोबर असणाऱ्या गड्यास सांगत की, साहेबांना वजन करून दाखव. आणि हो, हा वजनकाटा नेहमी तेथील बाकावर ठेवलेला असायचा. प्रत्येक वेळी वजन बरोबर यायचे. पण तसे दाखवल्यावर ते मान वर करून `बघा, बरोबर होते की नाही' वगैरे बिलकूल काही म्हणायचे नाहीत. फक्त `नेक्स्ट' (म्हणजे पुढचा विद्यार्थी) म्हणायचे. कारण तसे दाखवणे हे आपले कर्तव्य व कोणी विचारले तर तो त्याचा हक्क आहे अशी त्यांची मनोधारणा सर्वच बाबतीत असे. खरेतर त्यांनी जर अशा वेळी एकदाही सहेतुक नजरेने पाहिले असते तर नंतर कोणाचीच त्यांना विचारण्याची छाती झाली नसती.

रात्री कधी आमच्या रूम/बिल्डिंगचे दिवे गेले तर आमचे काम फक्त सरांच्या घरी जाऊन त्यांना सांगायचे. सर लगेच खिशातून एक शिट्टी काढून वाजवायचे, की लगेच तो वायरमन धावत आलाच म्हणून समजावा. तो इकडेतिकडे गेलाय असे कधी घडलेले कोणी पाहिले नाही. वालचंदच्या मेसमधील क्लब हे विद्यार्थ्यांनी चालवावेत अशी एक चांगली प्रथा तेथे रूढ होती. प्रत्येक पंधरवडा २ विद्यार्थी सांभाळायचे. त्यांना एफएस म्हणजे फोर्टनाईटली सेक्रेटरी संबोधले जाई. मेस कोणा एका पुरवठादार कंत्राटदारावर अवलंबून राहू नये यासाठी २ भाजीवाले व २ दूधवाले होते, तर पंधरवड्यासाठी लागणारे वाणसामान कोणत्याही दुकानातून घेण्याची एफएसला मुभा असे. मात्र कोणताही खर्च बिलाशिवाय मान्य नसे. हा एफएस सकाळी जेवत असताना भाजीवाला उभ्या उभ्याच त्याच्याकडून दिवसागणीक हव्या असलेल्या भाजीच्या ऑर्डर्स घेत असे. प्रत्येक क्लबला रोजच्या रोज त्या त्या दिवशीच्या हजर संख्येनुसार हिशेबाने तांदूळ व दळलेले गव्हाचे पीठ मिळे. अनुभवातून सरांनी बनवलेल्या नॉर्मस्प्रमाणे हे मिळे. कारण एखादा विद्यार्थी काही कारणास्तव मेसमध्ये जेवणार नसेल तर त्याचा खाडा व याउलट त्याचा एखादा पाहुणा (जसे आई, वडील, मित्र वगैरे) जेवणार असेल तर लागणारा गेस्ट चार्ज, सरांना किती दिवस याविषयी सूचना मिळाली त्याप्रमाणे कमीजास्त असे. आयत्या वेळच्या खाड्याबद्दल काही सवलत नाही, तर आयत्या वेळचे पाहुणे शुल्क कमाल असे. यासाठी विद्यार्थ्यांनी मेसमधील बॉ्क्समध्ये त्यांच्या खाडा/गेस्टविषयी तपशील माहिती देणारे कार्ड टाकावयाचे असे. हा बॉ्क्स रोज उघडला जाऊन सर त्याविषयीचा थोडक्यात तपशील रोजच्या रोज प्रत्येक विद्यार्थ्याचा नावानिशी उल्लेख असलेल्या प्रत्येक क्लबमधून सर्वांना दिसेल अशा पद्धतीने टांगलेल्या बोर्डावर लिहीत. जेणेकरून महिन्याची बिले बनवणे महिन्याच्या शेवटच्या दिवशी फार वेळ न खाता सोपे जाई. यासाठी बिलमन म्हणून विद्यार्थ्यांचीच नेमणूक केलेली असे.